घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा
क्रूरतेला राहिली सीमा न काही
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा
मंदिराची देणगी ही लाच 'त्या'ला,
की तराजू पापपुण्ये तोलण्याचा?
जीवघेणा खेळ आता सोड वेड्या,
कोवळ्या, ताज्या कळ्यांना जाळण्याचा
उंच जाताना न होते भान याचे,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा!
"आज मी कामात आहे, तू उद्या ये"
रोजचा त्याचा बहाणा, टाळण्याचा
तू नको घेऊस ध्यानी, मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा!
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा