...............
खेळ !
...............
कुणाचा तरी भास झाला !
सुगंधी किती श्वास झाला !
अकस्मात जवळीक झाली...!
दुरावा अनायास झाला !!
खरे तेच खोटे निघाले...
अविश्वास विश्वास झाला !
कुणाचा तरी जीव येथे...
कुणाचा तरी घास झाला !
बुडे कोण राजीखुषीने ?
किनाराच लंपास झाला !
तुलाही दिल्या वेदना मी...
मलाही तुझा त्रास झाला !
तसा जन्म गेला न वाया...
तसा खेळ हा खास झाला !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा