करार

क्रान्ति - ⏱ १ मिनिट

माझे कधी तुझ्याशी काही करार होते
तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते

श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे,
ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते

वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी,
गेले मिटून जितके हळवे विचार होते

वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली
काळोख पांगताना उघडेच दार होते

हातून सावलीचा निसटून हात गेला,
आयुष्य फाटलेले मी सांधणार होते

गझल