...................................
...पेटारा !
...................................
चार किरणांच्या गजांचा घेतला थारा कधी मी ?
बेइमानी तुजसवे केली न अंधारा कधी मी !
मी रहस्ये घेतली जाणून साऱयांचीच सारी....
शेवटी कळणार का माझा मला सारा कधी मी ?
मी धुळीच्याही कणाला मानतो पृथ्वीप्रमाणे...
उंच आकाशातला होईन का तारा कधी मी ?
वेगळे गाणे जरी हे चारचौघांहून माझे...
सूर आहे लावलेला, सांग तू, न्यारा कधी मी ?
पाठलागाची तुला नाही दिली बिलकूल संधी...
पाहुनी दुःखा तुला केला न पोबारा कधी मी !
मी कधी दिसलो कुणाला ? लागलो हाती कुणाच्या ?
...भासलो वारा कधी मी ! ...वाटलो पारा कधी मी !
पाहिले निष्पर्ण त्या झाडाकडे मी तुच्छतेने...
व्हायचो नाही जणू अजिबात म्हातारा कधी मी !!
भेट आयुष्या तुझीही थेट होईना अताशा...
सांग, तुज भेटायला येऊ कुणाद्वारा, कधी मी ?
ज्या चिजा दिसल्या तुम्हाला, मामुली आहेत साऱया...
आणला तुमच्यापुढे सारा न पेटारा कधी मी !
- प्रदीप कुलकर्णी
...................................
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा