अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

======================

अढी  कपाळावरील  जेव्हा  मनात  गेली..
कडू  विषाची  कुपी  जणू  जीवनात  गेली

अता  समजली  मला  सुखाची  प्रमाणव्याख्या,
अता  समजले- कितीक  वर्षे  भ्रमात  गेली..

तुझा  दुरावा  भरून  आहे  क्षणात  सार्‍या..
निदान  आता  विवंचनांची  ददात  गेली !

"यदा-यदा.."चा  कधीच  नाही  दिलास  प्रत्यय,
किती  युगे  आमची  तुला  पाहण्यात  गेली !

कडे- कपारी मधून  सांगे  मुकी  रियासत
"रणात  आम्ही  कमावली, ती  तहात  गेली"

लपून  तू  राहिलास  माझ्यामधेच  वेड्या...
सुखा ! तुला  शोधण्यात  माझी  हयात  गेली  !

 

-ज्ञानेश.
=======================

गझल