धुळीतला ध्रुवतारा...!

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..........................................
धुळीतला ध्रुवतारा...
..........................................

मी अलगद कोठे कधी झेलला गेलो ?
आदळलो, फुटलो, किती ठेचला गेलो !

मी सुखात होतो मागे, पडद्यामागे...
मी पुढे, तरीही पुढे, रेटला गेलो !

केली न कुणाच्या घरात मी घुसखोरी...
मी रस्त्यावरती कसा खेचला गेलो ?

मी आलो नाही जगात आपखुशीने...
हाणली कुणीशी लाथ; फेकला गेलो !

मी बनलो आपोआप बेट दुःखाचे...
मी आय़ुष्याने जसा वेढला गेलो !

मी म्हटले त्यांना - `जवळ जरा जाऊ द्या`
मी तुझ्यापासुनी दूर ठेवला गेलो !

केली न विनवणी कुठल्या सवंगड्याची...
मी जिकडे-तिकडे सदा एकला गेलो !

जिंकलीच मैफल, तेव्हा तेव्हा समजा...
मी जेव्हा जेव्हा कमी लेखला गेलो ! 

बहरेनच नक्की...आज, उद्या वा परवा...
मी मनात आता तुझ्या पेरला गेलो...!

होईल धन्य तेव्हाच राखरांगोळी...
जर तुझ्या अंगणी कधी रेखला गेलो !

आहेतच काही सूर मधुर जपलेले...
मी उगाच नाही पुन्हा छेडला गेलो...!

मी तिथून केला मुक्त कोंडलां वारा...
मी जिथे पहारेकरी नेमला गेलो !

ते म्हणोत मजला हलकासलका आता...
मी त्यांना कोठे कधी पेलला गेलो ? 

मी पडून आहे - धुळीतला ध्रुवतारा...
मी अजून नाही कसा वेचला गेलो ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल