उदास...!

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.........................................
उदास...!
.........................................

तशी अता राहिली कशाची न आस काही !
जगायला दे तुझे मला फक्त भास काही !

विचारतो मी कधी कधी पारिजातकाला....
`उधार देशील का तुझे मंद श्वास काही ? `

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !

अजून ही एवढीच आशा जिवंत आहे...
घडेल केव्हातरी मनातील खास काही !

जळेन मीही तुझ्याप्रमाणे उजेड द्याया...
उजेड देणे तुझीच नाही मिरास काही !

अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे...
अजूनही कालचेच येती सुवास काही

कधीच काळापल्याड गेले निघून कोणी...
अजून छाया तरी अशी आसपास का ही ?

बरेच काही लिहावयाचे अजून बाकी...
नवे पुन्हा जन्मतील माझ्यात व्यास काही !

प्रसन्न मी राहतो; तरीही अनेक वेळा...
विचार माझ्या मनात येती उदास काही !

- प्रदीप कुलकर्णी

..............................................

गझल