आजही

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

काही विशिष्ट कारणाने १६ फेब्रुवारीनंतर पुन्हा येथे गझल लेखन सुरू करत आहे.



----------------------------------------------------------------------



शेवटी ओळीत आशय हेलकावे आजही

फेकलेल्या कागदांचा ढीग लागे आजही


माहिती होते तुला हे माहिती होते मला

'मीच का बोलायचे' हा पेच आहे आजही


कोण होतो, कोण जाणे काय मी केले तिथे?

ठेवले आहे घरावर नाव माझे आजही


योजना माझ्यातुझ्या आता कशा रेखायच्या?

काल मी होतो जिथे तेथेच आहे आजही


एकदा येशील का? फेरा पुरा करशील का?

होत ठोका मंद, जाताना विचारे आजही


तीच ही जागा, जमाना आपला नाही जरी

वाटते थोडे तुझ्यासाठी बसावे आजही


वाट झाली वेगळी की ताण येतो केवढा

एकदा 'होतो तसे' होऊ नव्याने आजही


गझल