पुन्हा पुन्हा ते तसेच होते

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट


मनातले या मनात ठेवू, ठरून काही बरेच होते
पुन्हा पुन्हा सावरून घेतो, पुन्हा पुन्हा ते तसेच होते

मनास नाही इलाज काही, उगाच हेवा, उगाच जिद्दी
जरा कुठे गाडले जुने की लगेच काही नवेच होते

कुणाकुणाला दुखावले मी अमोज यादी प्रसार पावे
जिथे जिथे वाट काढली मी, समोर कोणी उभेच होते

प्रसिद्ध होऊन सिद्ध व्हावे, प्रकांडपंडीत नाव व्हावे
अशीच इच्छा असायची हे निदान तुमचे खरेच होते

अता कुणाला कधीच काही म्हणायचे बंद होत आहे
कशास काही म्हणायचे मी? जगात माझे हसेच होते...


गझल