=================
मी तुझ्या गावात नाही येत हल्ली
हे तुझ्या लक्षात नाही येत हल्ली..
एकदा शब्दाविना संवाद व्हावा
स्वप्न हे सत्यात नाही येत हल्ली
या जगाचा वेग इतका वाढला की,
गाय ही रस्त्यात नाही येत हल्ली
मोकळ्या दारास हे पुसतात वासे,
'का कुणीही आत नाही येत हल्ली?'
आजही ती सांगते ख्यालीखुशाली
कंप आवाजात नाही येत हल्ली !
वाढतो आहे पसारा कागदांचा..
अर्थ का शब्दात नाही येत हल्ली?
-ज्ञानेश.
=================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा