विकास आहे की अधोगती काही समजत नाही
आता माझी एक ओळही मलाच भावत नाही
तेजाच्या दिसताच खुणा धावून गाठणे उरले
आज उगवता सूर्य स्वतःची दिशाच कळवत नाही
गेलेला क्षण पाहुन वाटे उगाच घाबरलो की
येणारा क्षण पाहुन वाटे काही धडगत नाही
दिली आत्मविश्वासाला मी तिलांजली त्राग्याने
मग जे जमले ते जमले हे खरेच वाटत नाही
असो कुणीही, प्रत्येकाला हेच वाटते येथे
'मला समजते दुनिया, दुनियेला मी समजत नाही'
थकबाकी दु:खांची आता इतकी झाली आहे
काय व्हायचे याची तर कल्पनाच करवत नाही
कोणाच्या दु:खावर हा आनंद विसंबुन माझा?
सार्यांसाठी बरे असे काहीच का जमत नाही?
उत्कर्षाच्या शिखरावरती रामराम द्यावा..पण
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा