गलका !
धक्का बसला कसा कळेना, एक उडाला टवका !
आज पाहिले... रंगाखाली देव किती हा मळका !
सजावटींच्या दिव्यांपुढे ही शांत विलसते समई...
असो कितीही लखलखाट अन् असो कितीही भपका !
उगीच का डोळ्यांत अचानक पाणी दोघांच्याही ?
त्याच क्षणी मज लागे उचकी, तुला ज्या क्षणी ठसका !
तसा काल मी, असा आज मी, काय उद्याचे सांगू ?
माझ्याइतका माझा नाही कुणी घेतला धसका !
ऊब हवीशी स्वप्नांची... पण वास्तव हे तडतडते...
जगणे येते भानावर मग जसा बसावा चटका !
जागा होतो माझ्यामधला कधी कधी बैरागी...
रक्त जणू हे विरक्त होई...श्वास भासतो परका !
मौन आतल्या आत राहते झाड मनाचे दिवसा...
सायंकाळी मात्र त्यावरी आठवणींचा गलका !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा