आयुष्या

जगदिश - ⏱ १ मिनिट

आणशी इतके कुठोनी पेच आयुष्या?
रोजचे जगणे तुझे का हेच आयुष्या?

आज आनंदात थोडेसे जगू दे रे
मग उद्याला जायचे आहेच आयुष्या?

'दु:ख तू देऊ नको' हे सांगणे नाही
पाउली प्रत्येक का पण ठेच आयुष्या?

एकतर्फी प्रेम करण्याचा गुन्हा झाला
मी खुळा अन् प्रेमही वेडेच आयुष्या?

श्वासही नियमीत मी घेतो तुझ्यासाठी
भासती का स्पंदने ठोकेच आयुष्या?

फारशी चिंता अता माझी नको तुजला
घाव नेमाने तरीही देच आयुष्या

तू मला सोडून जाण्याची भिती नाही
चालले आहे जिणे नुसतेच आयुष्या

चाळता पाने जुनी पाणावले डोळे
हाय, झाले काय हे भलतेच आयुष्या

ठोकरा देतोस त्या खाऊनही हसतो
आजही म्हणतो तुला माझेच आयुष्या

जगदिश

गझल