तू जरा समजून घे

प्रज्ञा महाजन - ⏱ १ मिनिट

शब्द हे मौनातले रे, तू जरा समजून घे
हे असे कोरे बहाणे, तू जरा समजून घे.

हाय जाता जात नाही, धुंद रात तुझ्याविना
मागणे हे चांदण्यांचे, तू जरा समजून घे.

लागले हे सूर आता, मैफिलीस नवे नवे
सप्तकाचे ताल न्यारे, तू जरा समजून घे.

गुंफलेले श्वास सारे, सांगती सगळेच रे
हट्ट येथे गुंतण्याचे, तू जरा समजून घे.

लाट येता भावनांची, थांबवू मजला कसे
ते पुकारे वादळाचे, तू जरा समजून घे.

मोकळी गर्दी करावी, ती तरी भरती हवी
हे शहाणे वेड माझे, तू जरा समजून घे...

प्रज्ञा महाजन

गझल