हे तेच ते दिनरात..

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

हे तेच ते दिनरात...मी वैतागलो
नाही बदल त्यांच्यात...मी वैतागलो

जी पाहिजे ती चीज नाही गवसली
हिंडून बाजारात मी वैतागलो

ती मीलने, ती चुंबने, आलिंगने
सारेच हे स्वप्नात !...(मी वैतागलो)

घे आत किंवा सुचव ना जाण्यास तू
थांबू किती दारात ? मी वैतागलो

ही रोजची गर्दी नि घाई रोजची
हे रोजचे अपघात....मी वैतागलो

किटकीट पत्नीची नि पोरांचे रडे --
-- माझ्याच संसारात मी वैतागलो !

गझल