कचरा

अलखनिरंजन - ⏱ १ मिनिट

ही स्वानुभवावर आधारित गझल आहे, जरी विडंबनात्मक वाटली तरी!
खरोखरच हडपसरातला कचरा डेपो (नाक दाबून) पाहण्यासारखा आहे :)
==================================
हडपसराच्या वाटेवरला कचरा डेपो कचरा खाउन पोट भरेतो फुगतो आहे
धडधडणारा पिवळा वेटर कढई उलटी सांडुन त्याची सोय उद्याची करतो आहे

येथ कवीला स्फूर्तीसाठी आकाशीच्या बगळ्यांच्या माळेशी नाही देणेघेणे
झुकझुकगाडी डुकरांच्या रांगेची केली, खंडाळ्याच्या घाटामध्ये फिरतो आहे

एक दुचाकीस्वार सिटावर बसल्याबसल्या हेल्मेटातच यमनाची करतो मनधरणी
दाद मिळाली नाकापाशी दुर्गंधाची, गंधाराचा साज गळ्यातच गळतो आहे

पाउसओल्या जखमा अंगी बाळगणार्‍या रस्त्यावरती कोणी करतो डांबरपट्टी
मरण्यापूर्वी 'डेड' ठरविल्या दूरध्वनीच्या केबलसाठी कोणी थडगे खणतो आहे

गांधीजींच्या आकांक्षांचा 'स्टांप' बनवला, शिक्के मारुन मारुन त्याचा केला कचरा
होतकरूंच्या जंत्रीवरती ठोकुन शिक्का लोकसभांच्या कचराकुंड्या भरतो आहे

रचनाकर्ता असलेला किंवा नसलेला बहुधा करतो अनंत काळापासुन खाडे
सत्याचे गल्लीरस्ते आच्छादुन गेले, कचरा विश्वाचा उघड्यावर सडतो आहे

कविता करता करता बहुधा 'अलख निरंजन' उपडी करतो डोक्यामधली कचराकुंडी
कचरा कुठला, कविता कुठली, काय कळेना, पाहुन इकडे जो तो नाक मुरडतो आहे

गझल