शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

जीवनाच्यासारखा तूही लळा लावू नको
जीवनी येऊ नको, आलीस तर जाऊ नको

देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको

जन्म घेताना प्रवेशाच्या अटी ऐकून घे
आसवे जोपास बाळा, आसवे त्यागू नको

शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला
झोपही येणार नाही एवढा जागू नको

एकनाथाने समाधी माउलीची शोधली
संत येथे गाडले, तू चांगला वागू नको

आपल्या कादंबरीचे पान किंवा धूळ हो
वर्गणी भरल्याप्रमाणे तू मला चाळू नको

आजही नाराज का होतोस दैवा एवढा?
जन्म आला वेगळा हा, मागचे काढू नको

एवढे सांभाळ नाते की बनो इतिहास तो
मोडण्या आलेच तर मग हाकही मारू नको

वाग तू साधेपणाने अन्यथा हो 'बेफिकिर'
मार्ग तू स्वीकार कुठलाही, इथे राहू नको

गझल