...फर्मास गप्पा !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...............................
...फर्मास गप्पा !
...............................

नेहमी जो उत्तरांनी टाळलेला !
प्रश्न आहे एक मी रेंगाळलेला !

खूप दिवसांनी मने बहरून आली...
...आणि हा एकांतही गंधाळलेला !

वावरे तो सावली होऊन माझी...
जीव कोणाचा तरी घोटाळलेला !

तू समुद्राच्या नको मारूस बाता...
फेस हा त्याचाच तू लाटाळलेला !

तू कशाला आणशी डोळ्यांत पाणी..?.
जीव हा माझाच ना मी जाळलेला ?

बाब ही आहे इमानाची अखेरी...
भुंकतो जोरात कुत्रा पाळलेला !

या शिळोप्याच्या किती फर्मास गप्पा...
आणि हाती हा चहा वाफाळलेला !

- प्रदीप कुलकर्णी

गझल