मी असाच धावणार...थांबवू नको मला!
जाहला उशीर फार...थांबवू नको मला!
धूप दीप देव सर्व तू तुझे पहा अता
मी न हे जुमानणार...थांबवू नको मला!
एकमेव हा उपाय शेत नांगरायला..
मी स्वतःस जुंपणार...थांबवू नको मला!
रंगहीन चेहरे न येथ पाहती कुणी
मीही आज रंगणार...थांबवू नको मला!
स्वच्छ ना कुणी करील आत जाउनी स्वतः
हे गटार तुंबणार...थांबवू नको मला!
धुंद आज चांदणे, धुंद रूप हे तुझे
आणखी हवाहि गार्...थांबवू नको मला!
चार दीस मैफलीत थांबलो गडे तुझ्या..
संपली अता बहार थांबवू नको मला!
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा