काय सुनसान पोकळी आहे

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

काय सुनसान पोकळी आहे
की मनालाच काजळी आहे?

कालची भांडणे बरी होती
शांतता आज वादळी आहे

वादळे मीच आणतो आहे
त्यात माझीच पाकळी आहे

'जिंकणे, हारल्याविना काही'
कल्पना खूप आगळी आहे

भूतकाळात जायला आता
आठवण फक्त मोकळी आहे

'जे न क्षणभर विसावती'... जीवन
त्या क्षणांचीच साखळी आहे

तू कळवलेस ते बरे झाले
'आपल्याहीमधे फळी आहे'

मी तुझ्यासारखा कसा होऊ?
भूमिका वेगवेगळी आहे

लोकही काय भेटले येथे!
दोन कानांमधे नळी आहे

फार पाहू नको तिला आता
'बेफिकिर' जखम आंधळी आहे

गझल