मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू
कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू
का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?
खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू
सोडुनी जुनी भ्रमरवृत्ती
घट्ट प्रेमशृंखला शोधू
पैज अमृतातही जिंके
अशा शब्दआंचला शोधू
इंद्र होउनी उभा याचक
धाव, कवच-कुंडला शोधू
अनसुया, प्रियंवदा नसता
'भृंग', चल शकुंतला शोधू
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा