यातूनच माझे दैव सदा घडलेले

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

यातूनच माझे दैव सदा घडलेले
जे रस्त्यावरती ओवाळुन पडलेले

सुखशय्येची का नीज मला भावेना?
हे कुठल्या वेश्येवरती मन जडलेले?

ही आयुष्याची गाडी लागत आहे
या वासाने अस्तित्वच भडभडलेले

ही पिढ्यापिढ्यांची कमाल आहे मित्रा
की रडणार्‍यांना सावरती रडलेले

तू पूर्णपणे गेलास विसरुनी की मग
मिळते तेव्हा... केव्हाचे आवडलेले

का दगडांवरती भक्ती करता यारो?
फोडूनही बघा? कोण तिथे दडलेले!

तुमची तर पूजा अजून चालू आहे
गेले ते ढग, जे होते गडगडलेले

तू भेटतेस गर्दीमध्ये हल्लीही
पण पुन्हा न मिळते .. तेव्हा सापडलेले

ते परके होते, हात मला देणारे
ते माझे होते, जे होते नडलेले

एकाच ठिकाणी भेट आपली होते
हे नशीब असते जेव्हा आखडलेले

कोणीच शेवटी झाले नाही अपुले
'बेफिकीर' आहे प्रेत तुझे सडलेले

गझल