केवळ तुझी होऊन झंकारायचे

सोनाली जोशी - ⏱ १ मिनिट

केवळ तुझी होऊन झंकारायचे

आहे ठरवले मी तुला भेटायचे
केवळ तुझी होऊन झंकारायचे

आधीच आहे वाट माझी हरवली
कोठून रस्ते वेगळे शोधायचे?

आयुष्य हाती यायचे नाही कधी
पार्‍याप्रमाणे शेवटी विखुरायचे

'आहे इथे चुकले तुझे ' , समजून घे
(ठरलेच असते का तुझे भांडायचे?)

आहे मनी इतके कधीचे जे तुझ्या
ते सांग तू -नाही मला बाधायचे

कोठून आणू चांदण्या माळायला?
प्रेमात भलते काय पण मागायचे?

भेटीस येतो तू जरी स्वप्नामधे..
दिवसा मला का एवढे टाळायचे?

तू जवळ असता नेमके का आठवे-
नव्हतास तू तेव्हा कसे वाटायचे

गझल