नकोसे वाटते

क्रान्ति - ⏱ १ मिनिट

पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते
कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

गझल