केवढे छान दिवस होते ते

बेफिकीर - ⏱ १ मिनिट

मी तुला पाहताच तू बघणे, केवढे छान दिवस होते ते
आणि कोणास ते न जाणवणे, केवढे छान दिवस होते ते

तू दिसावीस एवढी इच्छा, वाट माझीच पाहणे तूही
आणि दिसताच मी, तुझे लपणे, केवढे छान दिवस होते ते

खूप गर्दी सभोवती असणे, एकमेकात गुंफणे डोळे
मान फिरवून तू हळू हसणे, केवढे छान दिवस होते ते

'छान दिसतेस' मी तुला म्हणणे, 'काय म्हणलास' तू मला पुसणे
बोलणे, ऐकणे, पुन्हा घडणे, केवढे छान दिवस होते ते

चौकशी वेगवेगळी करणे, उत्तरे गोडगोडशी देणे
माहिती रोज रोज वाढवणे, केवढे छान दिवस होते ते

धीट प्रस्ताव मांडणे माझे, लाज अनुमोदनात भिनलेली
हात हातात यायला धजणे, केवढे छान दिवस होते ते

प्रेम माझे कबूल आहे हे, सांगुनी लाजर्‍या कटाक्षांनी
चोरट्या चुंबनांत सावरणे, केवढे छान दिवस होते ते

नेहमी भेट घ्यायची असणे, नेहमी कारणे पुढे करणे
नेहमी तेच आपले रुसणे, केवढे छान दिवस होते ते

काय होणार यापुढे अपुले, जाण नाही तुला मला काही
आपले 'बेफिकीर'से जगणे, केवढे छान दिवस होते ते

केवढे छान दिवस होते ते.........

गझल