पांघरूनी वेड वावरणे बरे की
भेटतो त्याला गुरू करणे बरे की
छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की
नाटके निर्भीडतेची जीवघेणी
छान, नैसर्गीक चाचरणे बरे की!
हेच का ते प्रेम ज्याचे नाव आहे
याहुनी झटक्यामधे मरणे बरे की
पांचजन्याचा पुरे हा आव आता
आपले अस्तित्व खाकरणे बरे की
मार्ग हा नाहीतरी काट्याकुट्यांचा
फ़ाटक्या गझलेस अंथरणे बरे की
वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की
पापण्यांचेही अता वय होत आहे
आसवे जाहीर पाझरणे बरे की
तू पुन्हा येशील ही भीती मनाला
याहुनी मृत्यूस घाबरणे बरे की
(सूट - पहिल्या मिसर्यात 'पांघरूनी' मधील 'रू' दीर्घ घेतला आहे. तो दीर्घ असतो की नाही हे नक्की माहीत नाही.)
(बेफिकिरी)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा