भग्न : मधुघट

मधुघट - ⏱ १ मिनिट

विदूराच्या कुटीमध्ये सुखाने जेवला होता!
गडी होऊन नाथांच्या घरी तो राबला होता!

अता ह्या भग्न गाभार्‍यात नाही एकही मूर्ती
कुणाचा शाप येथे देवतांना भोवला होता?

तुझ्या ह्या चार शब्दांनी सखे मी मोकळा झालो!
जरासा गाळ माझ्याही तळाशी साठला होता!

सुगंधाचे हवेला हेलकावे कोठुनी मिळती?
तुझा संभार केसांचा कधी गे मोकळा होता?

न तू ओलांडला केव्हा, न मीही तोडला केव्हा..
कसा दोघांत दैवाने अडथळा टाकला होता?

अजूनी ताठ त्याचा वाटतो आहे कणा, मग तो..
कसा कोणापुढे केव्हा कशाला वाकला होता?

गझल