'....राहू दे मला माझा !!'

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट


'....राहू दे मला माझा !!'


तुला घे चांदणे...अंधार राहू दे मला माझा !
तुला घे फूल...हा अंगार राहू दे मला माझा !


प्रपंचाला तुझ्या येवो सुखांची रेशमी शोभा...
व्यथांचा फाटका संसार राहू दे मला माझा !


तुला जो पाहिजे होता, दिला तो सूर मी दुनिये...
अता हा आतला गंधार राहू दे मला माझा !


पुन्हा मी छेडला जाईन की नाही; कसे सांगू...?
अखेरीचाच हा झंकार राहू दे मला माझा !


कसाही का असेना...चेहरा माझा स्वत:चा हा - 
असो वंगाळ की भंगार...राहू दे मला माझा !


मला माझाच राहू दे तुझी सोसायला दु:खे -
तुझ्या दु:खांत अपरंपार राहू दे मला माझा !!


कशी कोठून आणू सभ्यता मी बेगडी, खोटी...?
जरी हा रानटी संस्कार...! राहू दे मला माझा !

खुळी स्वप्ने, शिळी दु:खे, फिक्या आशा, मुके अश्रू...
तुझा नाहीच...हा संभार राहू दे मला माझा !


कुणाचा रंग का घेऊ ? कुणाला रूप का मागू ?
विनंती हीच वारंवार - 'राहू दे मला माझा !!'


 


गझल