शब्द होते, तरी..

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

-----------------------------------------

प्रेम माझे तुझे केवढे खुंटले,
शब्द होते तरी बोलणे खुंटले !

वाढले रोप जे काल सर्वांमधे,
खुंटतांना किती एकटे खुंटले !

मागतांना किती दूर होतास तू,
भेटतांना तुला मागणे खुंटले !

कल्पना ती किती मुग्ध होती बरे!
वृत्तछंदातले सापळे खुंटले

पाहतांना तुला लोचने संपली,
रेखतांना तुला कुंचले खुंटले !

एवढे क्षुद्र झालो अम्ही शेवटी,
की अता आमचे खुंटणे खुंटले !

-ज्ञानेश.
-------------------------------------------

गझल