तोडून पाश इथले, हा दूर चाललो मी
बहुधा नव्याच आता मोहात गुंतलो मी
दे तू मला तुझे ते आयुष्य फाटलेले
ठिगळे जुन्या सुखांची नेसून त्रासलो मी
उपयोग काय आता फाडून पत्र माझे
ते वाचताच तुझिया हृदयात उतरलो मी
दु:खासवे लढाया मी नित्य सज्ज होतो
पण सामना सुखाशी होताच बिचकलो मी
हातात हात आला, तोवर उशीर झाला
स्पर्शापल्याड होतो केव्हाच पोचलो मी
बाजार दाखवाया नेलेस अन् समजलो
येईल भाव तेथे इतका वधारलो मी
- नचिकेत जोशी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा