==========================
इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते ! *
बर्याच वर्षानंतर भेटुन जाणवले की
बरेच काही मधल्या काळी घडले होते !
तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते !
एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..
काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्याच्या कानात मुके ओरडले होते !
त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते
कागद दिसला, तत्परतेने उमटुन गेले
पेनामधले शब्द किती अवघडले होते...!
--ज्ञानेश.
===========================
(* मतल्याची प्रेरणा- बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा