.................................................
...जायला हवे !
.................................................
मन विसकटून, चुरगळून जायला हवे !
जगणे जरा तरी मळून जायला हवे !
हे दोन-चार कोरडे तरंग तेच ते ...
सारे तळेच खळबळून जायला हवे !
नक्की कधीतरी जमेल...आज ना उद्या...
फुलल्याविनाच दरवळून जायला हवे !
माझे तुझ्याविना न पान हालते जरी...
मी एकटेच सळसळून जायला हवे !
हे रोजचे जिणे नव्हे जिणे; तुरुंग हा...
आता इथून मज पळून जायला हवे !
ताटातुटीत ज्यास हे जमेल तो खरा...!
मागे न पाहता वळून जायला हवे !
येते कधी तरी अजूनही तरंगुनी...
माझ्यात दुःख विरघळून जायला हवे !!
हा देह पापशून्य व्हायचा कधी ? कसा?
आता किती, कसे जळून जायला हवे ?
मी-तू किती उजेड पाडला तसा इथे ?
आता मला-तुला ढळून जायला हवे !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा