पांडुरंगा

प्रशान्त वेळापुरे - ⏱ १ मिनिट

पांडुरंगा

का भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा ?
का देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा ?

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा !

आता युगायुगांची चर्चा कशास व्हावी
प्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा !

प्रशांत वेळापुरे
पंढरपूर

गझल