...घट एकांतात झरावा !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.......................................................
...घट एकांतात झरावा !
.......................................................

सोईने ज्याने-त्याने जगण्याचा पट पसरावा !
दिवसाची रात्र करावी; रात्रीचा दिवस करावा !

कोणाच्या आठवणींनी डबडबती माझे डोळे... ?
आईचे दुःख दिसावे ! बापाचा त्रास स्मरावा !

जिंकावे दोघांपैकी कोणीही; हरकत नाही...
माझी अट इतकी आहे, खेळाला रंग भरावा !

मी माझ्या सोबत आहे अन् आगे-मागेसुद्धा...
मी माझी साथ करावी; मी माझा हात धरावा !

टीकारामांनी घेता कवितेची अग्निपरीक्षा....
शब्दांचे हीन जळावे...अर्थांचा गंध उरावा !

इच्छा ही एकच माझी शेवटची आहे आता...
मृत्यूने येण्याआधी माझा हा जन्म सरावा !

गाण्याने निःशब्दाच्या मन माझे चिंब भिजावे...
मौनाच्या संगीताचा घट एकांतात झरावा !

- प्रदीप कुलकर्णी

गझल