शिखर त्यांनी गाठलेले, पायथा धुंडाळतो
चालती तो-यात सारे मीच का ठेचाळतो |१|
देव दगडांतील येथे पुजुन का कंटाळतो
माणसांतिल देव तेथे पूजणे ना टाळतो |२|
शोभती जरि आज कपडे भरजरी अंगावरी
कालच्या सद-यावरीचे ठिगळ का कुरवाळतो |३|
फाटकी लेऊन वसने गरिब अब्रू झाकतो
अब्रु उघड्यावर थिरकते मंच ना ओशाळतो |४|
चोर अपराधीच येथे उजळ माथे मिरवती
वेदना इतरां न होते तीच का कवटाळतो |५|
बीज ते साधेपणाचे काल कोणी पेरले
रोप भाऊबंदकीचे आजला सांभाळतो |६|
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा