==========================
भोवतालावरी घट्ट ताबा तुझा केवढा राहतो..
दूर गेलो कितीही तरी शेवटी मी तुझा राहतो !
आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे?
या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो
हा कसा क्रूस आहे, इथे रोज अस्थिर का वाटते?
नेमका कोणत्या भावनेचा खिळा हालता राहतो?
प्रश्न नाही असा की पुन्हा का निराशाच केलीस तू
प्रश्न आहे असा- मी तुझ्यावर विसंबून का राहतो?
काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी
एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो..
वाटले सर्व काही नव्याने जरी रोजच्यासारखे,
आठवण राहते, राहतो डाग आणि तडा राहतो...
-ज्ञानेश.
===========================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा