..आता नको !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...आता नको !

जिवाचा कुणी यार आता नको !
कुणाचाच आधार आता नको !

नका  आत घेऊ कुणीही  मला...
खुले एकही दार आता नको !

रुकारात होकार देशील का ?
नकारात होकार आता नको !

मला प्यार आहेत काटेकुटे...
फुलांचा मला हार आता नको !

स्वतःचीच विक्री जिथे व्हायची....
असा चोरबाजार आता नको !

सतारीस माझ्या असे वाटते - 
पुन्हा तोच झंकार आता नको !

नको भासविश्वातले हे जिणे...
खुळा स्वप्नसंसार आता नको !

मुक्यानेच सारे मना सोस तू...
कशाचीच तक्रार आता नको !

हसू येत आहे अटीचे तुझ्या -
`मजाही मजेदार आता नको !`

तुला वेळ होताच तेव्हा कुठे...?
दिलासे तुझे चार आता नको !

तुझे शाप, उःशाप होतीलही...
मिळाले मला फार...आता नको !

असे काजव्याने म्हणूही नये - 
`सभोवार अंधार आता नको !`

- प्रदीप कुलकर्णी

 

 

 

गझल