मौन

अनिरुद्ध अभ्यंकर - ⏱ १ मिनिट

मी जरी  हे बोलण्याचे टाळले होते
आसवांनी मौन कोठे पाळले होते

बोलताना ती जराशी हासली तेव्हा
मी उगाचच अर्थ सारे चाळले होते

दुःख ही येथे खरे मज भेटले नाही
भास हे नुसतेच मी कवटाळले होते

मोजताना घाव माझे आज ही चुकले
आठवेना नाव कुठले गाळले होते

ओळखीचा वाटतो ना चेहरा माझा
ओळखीचे घाव सारे वाळले होते

रोजची पाहून येथे आसवे माझी
दुःख ही माझे मला कंटाळले होते

वाहवा माझ्या न गीताला मिळाली ही
लोक माझ्या वेदनेवर भाळले होते

गझल