...मन माझे !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...मन माझे !

का उगीच तळमळते मन माझे ?
सारखेच मज छळते मन माझे !

दूर दूर पुनव फुले अवकाशी...
चांदण्यात दरवळते मन माझे !

ऐकशील सहजपणे जर केव्हा...
शांत शांत सळसळते मन माझे !

घाव घाव स्मरत बसे दिन-राती
एकटेच भळभळते मन माझे !

हे खरेच, दगड कधी बनतेही...
आसवांत विरघळते मन माझे !

ही उमेद वरवरची, थकलेली...
हे कळून मरगळते मन माझे !

घट्ट घट्ट पकड किती जगण्याची...
बंधनात वळवळते मन माझे !

हा बघून सतत खुला दरवाजा...
उंबऱ्यास अडखळते मन माझे !

हेच, हेच कळत कसे मज नाही...
का खरेच तुज कळते मन माझे ?

सांग तूच स्मरण असे कुठले ते...?
का तिथेच घुटमळते मन माझे ?

ये हळूच, अलगद ये हलक्याने...
सावकाश! डचमळते मन माझे !

आळ रोज मजवरती कसलेही...
रोज रोज चुरगळते मन माझे!

मी  विचार  भलभलते करतो का...?
...यामुळेच मग मळते मन माझे !!

- प्रदीप कुलकर्णी

गझल