...जाऊ दे मला !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...जाऊ दे मला !

सोड माझा हात...जाऊ दे मला !
फार झाली रात...जाऊ दे मला !

मी मलाही ओळखेनासा जिथे...
त्या स्थळी अज्ञात...जाऊ दे मला !

मी नवा झालो; मला रोखू नको...
टाकली मी कात...जाऊ दे मला !

ज्या ठिकाणी गार होतो जीव हा...
त्या ठिकाणी जात जाऊ दे मला !

पायरी सोडून माझे मागणे -
`उंबऱयाच्या आत जाऊ दे मला ! `

मी कशासाठी खरे-खोटे करू...?
- घाल तू रुजवात...जाऊ दे मला !

वाट मौनाची जरी आहे तरी...
गीत माझे गात जाऊ दे मला !

या कथेचा अंतही मी जाणतो...
ऐकली सुरवात...जाऊ दे मला !

एकदाची मोकळी झाली मने...
थांबली बरसात...जाऊ दे मला !

कौतुकाने पोट भरते हे खरे...
...पण शिव्याही खात जाऊ दे मला !!

येरझारा जन्म-मृत्यूच्या नको...
बास यातायात...जाऊ दे मला !

- प्रदीप कुलकर्णी

गझल