काय नभाची आहे इच्छा पाहू
कसा बरसतो पाउस यंदा पाहू
डोळ्यांची तर तहान भागत आहे
ओठांची मिटते का तृष्णा पाहू
दूर स्वत:पासून जरासे जाऊ
अन् थोडा अपुलाच तमाशा पाहू
करपवणारे ऊन पाहुनी झाले
गोठवणार्या आता गारा पाहू
जगण्याची कातडी बडवतो आहे
बघणारा धरतो का ठेका पाहू
बघू कोणते पाउल अंतिम ठरते
कुठे जाउनी सरतो रस्ता पाहू
सोंगुन झाले पीक अता स्वप्नांचे
मळणीचाही क्षण येतो का पाहू
- वैभव देशमुख
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा