माझ्यातला चांगुलपणा वर आण तू
हो चांगला......मी चांगला हे जाण तू
सारे जुने होते तुझ्यासाठी नवे
केलेस काहीही कुठे निर्माण तू
तीही पुढे भासेल चंद्रासारखी
केलीस ह्या विश्वामधे जी घाण तू
नाही तिथे पडतो असा पाऊस मी
ज्यातून येते रोप तो पाषाण तू
सांगायचे होते......मला समजून घे
पण ठेवले नाहीस तितके त्राण तू
निश्चिंत कोणीही कसे नाही इथे
हैराण मी हैराण जग हैराण तू
घेशील जितका तेवढा वाढेल तो
सैलावलेल्या चिरगुटांचा ताण तू
शरणागती घेण्यास ते होते उभे
उडवायची होतीस दाणादाण तू
जर व्हायचे नव्हते तुला माझे कधी
तर घ्यायचे होतेस माझे प्राण तू
माझ्यामुळे तू गाजली होतीस पण
लावण्य होतो मी नि माझी खाण तू
इतकेच सांगायास मी आलो इथे
थोडेतरी वात्सल्य अंगी बाण तू
समजायची ज्यांना गझल ती समजली
कर 'बेफिकिर' आता महानिर्वाण तू
-'बेफिकीर'!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा