तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
कुणीही दाखवा.....आम्ही तिचा सत्कार ठेवू
नदी......जी सागरापाशी मनापासून जाते
तिच्या संधीप्रमाणे वागण्याचा राग येतो
कधी येथून जाते ती कधी तेथून जाते
तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते
तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते
कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते
कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते
कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते
शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते
जगाला सांग...... वाचव खर्च तू मद्यालयाचा
मला रोखायला येते...... मला पाजून जाते
किती वर्षे प्रतीक्षा चालली आहे तिची ही
म्हणाली 'बेफिकिर' जी "मी उद्या येऊन जाते"
-'बेफिकीर'!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा