शोधताना मी सुखाला हरवले आहे स्वत:ला
जिंकल्या डावात माझ्या गमवले आहे स्वत:ला
स्वप्नं त्या डोळ्यात मी ही हासण्याचे पाहिलेले
पण तिच्या अश्रूत आता भिजवले आहे स्वत:ला
डाव नियतीचाच होता, की मला हरवायचे... पण
मात केली मी तिच्यावर, घडवले आहे स्वत:ला
गंध श्वासांचा तुझ्या जो वाहतो प्राणात आहे
तू दिले मज श्वास अन मी जगवले आहे स्वत:ला
हे मला माहीत नाही, भेट व्हावी वा न व्हावी
आठवण तर सांगते की, भुलवले आहे स्वत:ला
जा नको येवूस माझे धरण अश्रूंचे पहाया
गोठते पाणी तसे मी बनवले आहे स्वत:ला
"तू कुडी सोडून जा रे" हे कसे सांगू तुला मी
मीच आत्म्याच्या समोरी नमवले आहे स्वत:ला
-महेंद्र राजगुडे
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा