काटाकाटी श्वासांचीही..

संतोष कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

अवतीभवती थकलेल्यांना वाचत जातो
शब्दांना तेव्हाही वाटे, जाचत जातो


प्रत्येकाच्या अग्रावरती मीपण असते
'मी'च तरीही प्रत्येकाला डाचत जातो


जीवन म्हणजे काटाकाटी श्वासांचीही,
छातीलाही मांझा त्याचा काचत जातो


चुकवत गेलेला मृत्यूही अनुशेषासम
आयुष्याच्या काठावरती साचत जातो


मरगळलेल्या निमिषांनाही पडताळाया,
मोर उगाचच उत्साहाचा नाचत जातो


फाटत जाणारी रक्ताची नातीगोती
कोणी रक्ताच्या धाग्यांनी टाचत जातो


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल