.........................
शब्द ठेचाळतो...
.........................
उंबऱ्याशी तुझ्या जीव घोटाळतो !
याचसाठी तुझी वाट मी टाळतो !
शब्द देऊन विसरून जातेस तू...
शब्द नाही दिला मी, तरी पाळतो !
दुःख नाहीच ते मानतो दुःख मी
कोरडी कोरडी आसवे ढाळतो !
लागते सावरावेच ना शेवटी ?
तोल जाता, मला मीच सांभाळतो !
तीच ती ही कथा ! तीच ती ही व्यथा !
सांगतो रोज मी ! रोज कंटाळतो !
बंद दारापुढे थांबतो रोज मी...
वाट पाहून पाहून ओशाळतो !
कीव माझी न वाटो जगाला, तुला...
जीव हा आतल्या आत मी जाळतो !
रोज उमलून येतेस तू अंतरी...
मोगरा रोज रक्तात गंधाळतो !!
भूतकाळात हिंडून येतो जरा...
रोज पत्रे जुनी मी तुझी चाळतो !
सापडूही नये मी कुणाला कुठे...
मी लपाया असे गाव धुंडाळतो !
भेटलेला मुका एक रस्त्यावरी
रोज स्वप्नात येऊन किंचाळतो !
सांज कलते जशी...या मनाच्या बनी
सावळा सावळा सूर रेंगाळतो !
आज सूर्यावरी वेळ आली अशी...
आरती काजव्यालाच ओवाळतो !
वाट सोपी न कविते, तुझी एवढी...
शब्द ठेचाळतो ! अर्थ रक्ताळतो !!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा