कवितेमधून माझ्या येतो सुवास माझा !
एकेक शब्द आहे हा खास, खास माझा !
माझ्या कथे-व्यथेची जावी बनून गाथा...
इतकीच आस माझी, इतकाच ध्यास माझा !
डोळे मिटून सारे पाहून घेतले मी...!
बसल्यास्थळीच सारा झाला प्रवास माझा !!
- याला प्रसन्नतेने आवाज दे तुझा तू...
आहे किती किती हा मुखडा उदास माझा !
नेऊ नका कुठेही मज चौकशीस आता...
काढू नका कुणीही आता तपास माझा !
कळते मला, दिशेला आहेस कोणत्या तू...
कलतो पुन्हा पुन्हा हा तिकडेच आस माझा !
वारा बनून आता चुंबीन मी तुम्हाला...
सोसाल ना फुलांनो, इतकाच त्रास माझा ?
मी नाद स्पंदनांचा व्हावे तुझ्या उरीच्या...
माझी बनून तूही घ्यावास श्वास माझा !
तुज मागतो कुठे मी सारेच पान कोरे ?
आहे मला पुरेसा थोडा समास माझा !
झाली कठोर शिक्षा मज एकटेपणाची...
माझ्यावरी पहारा देणार भास माझा !!
नगरी अशी कशी ही ? येथे विराट नाही...
काढू कसा, कुठे मी, अज्ञातवास माझा ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा