.. तूही प्रसन्न हास !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...................................
.. तूही प्रसन्न हास !
....................................

हा दूरचा प्रवास... किती दूरचा प्रवास !
अन् सावलीशिवाय न कोणीच आसपास !

सोईनुसार सारे ! ही सोय, गैरसोय...
तू आपुला !तुझा मी मानू कशास त्रास ?

ये...छेड मारव्याची तू आर्त आर्त धून...
ये...सांजवेळ माझी कर आणखी उदास !

तू सांग, घेतलीस कला ही कुणाकडून ?
कडवेपणा मनात नि वाणी तुझी मिठास !

गंधाळतेस माझ्या तू रोज काळजात...
येतो तुझ्या मनाला माझाच ना सुवास ?

मज सांग तूच - माझी तू लागतेस कोण ?
मज पाहता, तुझा का येतो फुलून श्वास ?

येतो कधी चुकून अता फक्त एक फोन...
बोलायचीस तेव्हा का रोज तास तास ?

माझ्या गुहेत ये तू केव्हातरी असाच...
काही चिजा इथेही आहेत खास खास !!

डोळे पुसून मीही आलो तुझ्यासमोर...
विसरून दुःख  सारे तूही प्रसन्न हास !

- प्रदीप कुलकर्णी

गझल