.........................................
मी अहल्येसारखी...!
.........................................
शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे ना जग जरा उजळून तू !
आंच दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?
वेळ भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !
संपलो मी ! वैर माझे संपले...
जा फुले माझ्यावरी उधळून तू !
दुःख झाले कोणते इतके तुला ?
हासशी सर्वांग का घुसळून तू ?
काळजाला सल पुन्हा काट्यापरी...
...आणि मग डोळ्यांत जा तरळून तू !
फेकली कोणी तळाशी पौर्णिमा ?
काढ अंधारास या ढवळून तू !
ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!
चारचौघांसारखा आहेस ना ?
चारचौघांच्यात जा मिसळून तू !!
शब्द तू एकेक हा घासून घे...
अर्थही एकेक घे विसळून तू !!
मी अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा