किंमत

अनिरुद्ध अभ्यंकर - ⏱ १ मिनिट

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला


प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला

मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला


काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला


बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला


हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला

भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला


माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला

गझल